सिल्लोड - सोयगावमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा,
आ. अब्दुल सत्तार यांची शेताच्या बांधावर पाहणी,
सिल्लोड (प्रतिनिधी) : पावसाने मोठ्या प्रमाणात दडी दिल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी आज सिल्लोड, अजिंठा, शिवना, पिंपळदरी, डोंगरगाव आदी भागांतील शेताच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच डोंगरगाव, पिंपळदरी, शिवना आदी ठिकाणी गाव बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर दिला.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाढता उत्पादन खर्च आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील सुमारे ६० ते ६५ टक्के जमीन मुरमाड व खडकाळ असल्याने पावसाच्या खंडाचा पिकांवर अधिक विपरीत परिणाम झाला असल्याचे आमदार सत्तार यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती दुष्काळापेक्षाही गंभीर असल्याने सिल्लोड-सोयगाव तालुक्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी आमदार सत्तार यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे
--पाठपुरावा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू --
गाव बैठकीत त्यांनी गावपातळीवर तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी केली. तसेच सद्यस्थितीचा विचार करून तातडीने कृती आराखडा तयार करावा आणि तो प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी सूचना केली. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर व विश्वास देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसैनिकांनीही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून घेण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या वर्षी पात्र असूनही चुकीच्या माहितीमुळे अनेक शेतकरी पीकविमा लाभापासून वंचित राहिले. यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीकविमा व शासनाच्या मदतीचा लाभमिळावा, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सिल्लोड सोयगावसह राज्यातील सद्यस्थितीचा तातडीने सर्वंकष आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई व इतर आवश्यक शासकीय सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही आमदार सत्तार यांनी केली. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नायब तहसीलदार तुकाराम बनकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आशिष मस्के, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, कृषी मंडळ अधिकारी विनोद मोरे, गणेश इंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासिर हुसेन, राजूबाबा काळे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, शेख सलीम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक नानासाहेब रहाटे, जयराम चिंचपुरे, संदीप राऊत, देविदास लोखंडे अशोक सूर्यवंशी, मुरलीधर काळे, राजुमिया देशमुख यांच्यासह कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाचे अधिकारी - कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.















